रिक्षा चालकाची दादागिरी; महिला प्रवासी दुसऱ्या रिक्षात बसल्याने त्या रिक्षा चालकाला कॉलर धरून धमकी व शिवीगाळ...!

पुरंदर रिपोर्टर Live 

उरुळी कांचन, ता. हवेली | प्रतिनिधी

                          पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक आणि रिक्षा चालकांच्या मुजोरीने नागरिक त्रस्त झाले असून, गुरुवारी दुपारी घडलेली एक घटना समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका महिला प्रवाशाने क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या रिक्षामध्ये बसण्यास नकार दिल्यामुळे, संबंधित रिक्षा चालकाने तिच्यावर आणि दुसऱ्या रिक्षा चालकावर राग काढत , हा धक्कादायक प्रकार केला.


ए लाइट चौक, उरुळी कांचन येथे गुरुवारी (दि. २९) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक अ‍ॅप्पे रिक्षा चालक प्रवासी भरत होता. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बळजबरीने बसवले जात असल्याने एका महिलेने त्या रिक्षात बसण्यास नकार दिला आणि दुसऱ्या रिक्षात जाऊन बसली. या प्रकाराने संतप्त झालेल्या अ‍ॅप्पे रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षाचालकाची कॉलर धरली, चावी काढून घेतली, शिवीगाळ करत धमकावले आणि संबंधित महिलेला रिक्षातून उतरवले.


ही घटना पाहून उपस्थित एका प्रवाशाने मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग सुरू केले असता, संबंधित रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांनी त्या दुसऱ्या रिक्षेचा तीन किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. सोनतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत त्यांना अडवून "शूटिंग काढू नका, आमचं कोणी काही करू शकत नाही" अशी धमकी दिली.


पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असून, त्यात अ‍ॅप्पे रिक्षा, सिक्स सीटर, मॅक्सिमा, स्कॉर्पिओ, ईको आणि टेम्पो ट्रॅव्हलर अशा वाहनांचा मोठा सहभाग आहे. काही तीन चाकी वाहनांमध्ये दहा ते अकरा प्रवासीぎ बेकायदेशीरपणे भरले जात असून, यामुळे अपघाताचा धोका वाढतो आहे.


आरटीओ पासिंग नसलेली आणि भंगार झालेली वाहनेही या मार्गावर बेधडकपणे धावतात. वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावर दादागिरी करणाऱ्या चालकांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, "गरिबांवर अन्याय न करता अवैध वाहतूक करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करा" अशी जोरदार मागणी होत आहे.


वाहतूक विभागाने यावर तात्काळ लक्ष घालून कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments